Monday , August 31 2026
Breaking News

युवकांना संघटित करून गावाच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे कै. अशोकराव मोदगेकर : श्री. वसंत पाटील

Spread the love

 

निलजी : रणझुंझार परिवार व कै. अशोकराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे समाजाच्या प्रगतीसाठी तळमळीने कार्य करणारे तसेच रणझुंझार परिवारातील विविध संघ-संस्थांचे संस्थापक कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचा सहावा स्मृतिदिन निलजी येथे गांभीर्यपूर्ण वातावरणात पाळण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई अशोकराव मोदगेकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक श्री. वसंत पाटील उपस्थित होते.

रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कै. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक वसंत पाटील यांनी कै. अशोकराव मोदगेकर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना सांगितले की, त्यांनी रणझुंझार युवक संघाची स्थापना उदात हेतू व दूरदृष्टी ठेवून केली. त्याद्वारे गावातील युवकांना एकत्रित करून गावच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शन व दातृत्वाच्या पाठिंबातून गावात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात फार मोठा बदल घडविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमनी यांनी प्रास्ताविकातून कै. अशोकराव मोदगेकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. “गावामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जर कोणी केले असेल, तर ते फक्त आणि फक्त कै. अशोकराव मोदगेकर यांनी केले,” असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. गोरगरीब व गरजूंसाठी त्यांनी केलेली मदत तसेच “चला, उठा आणि संघटित व्हा!” या विचारातून त्यांनी उभे केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

नारायण आपटेकर यांनी आपल्या भाषणात कै. अशोकराव मोदगेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांनी निलजी गावात रणझुंझार युवक संघाची स्थापना करून एका छोट्याशा रोपट्याची लागवड केली. पुढे विविध संघ-संस्थांची स्थापना व उभारणी करत त्यांनी या छोट्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर केले.”
पंचक्रोशीत निलजी गावाची ओळख निर्माण होण्यामागे कै. अशोकराव मोदगेकर यांचे दूरदृष्टीचे कार्य आणि त्यांनी उभ्या केलेल्या विविध संघ-संस्थांचा मोठा वाटा आहे, असे यांनी नमूद केले. “कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचा जन्म निलजी गावात झाला, हे निलजी गावचे भाग्यच आहे,” अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

रमेश मोदगेकर यांनी कै. अशोकराव मोदगेकर यांनी पूर्व भागाच्या विकासासाठी तसेच रणझुंझार परिवारासाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या कार्यामागील सामाजिक बांधिलकी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका याबद्दल त्यांनी आठवणी सांगितल्या.

कै. अशोकराव मोदगेकर यांच्या स्मरणार्थ रणझुंझार शिक्षण संस्थेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

तसेच, कै. अशोकराव मोदगेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री. निखिल मोदगेकर यांच्या वतीने एस.एस.एल.सी. परीक्षा २०२५-२६ मध्ये रणझुंझार हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचारीवर्गाला गणवेशाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला मारुती गाडेकर, अमर मोदगेकर, भाऊसाहेब मोदगेकर, सिद्राय वर्पे, कपिल गोमाणाचे, प्रिया पाटील, संतोष पाटील, तेजस्वी मोदगेकर, आनंद रजपूत यांच्यासह रणझुंझार परिवारातील सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक वाय. पी. पावले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता देसाई यांनी केले, तर रणझुंझार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बृहन्महाराष्ट्र मंडळ सदैव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी : दिलीप कुंभोजकर

Spread the love  अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर यांचा बेळगाव येथे जाहीर सत्कार बेळगाव : बृहन्महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *