Monday , August 31 2026
Breaking News

बेळगावातील BSNL नेटवर्क समस्येवर तातडीने उपाययोजना करा

Spread the love

 

 

ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये BSNL मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली असून, ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली.

असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव कमरुद्दीन सौदागर आणि संजय पाटील यांनी 31 ऑगस्ट रोजी खासदार शेट्टर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. फोर्ट रोड, जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालय परिसर, गोवावेस कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, बेळगाव महापालिका कार्यालय परिसरासह शहरातील अनेक भागांत BSNLचे ग्राहक मोठ्या संख्येने असूनही पुरेसे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून BSNLची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना वारंवार नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत BSNLच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. शहरात आवश्यक तेवढे नेटवर्क टॉवर नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचा दावा असोसिएशनने केला.

त्यामुळे शहरातील नेटवर्कची गरज असलेल्या भागांचे सर्वेक्षण करून नवीन मोबाईल टॉवर उभारावेत आणि BSNLची सेवा अधिक सक्षम करावी, अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली.

आकाशवाणीच्या सिग्नलमध्येही सुधारणा करण्याची मागणी

यावेळी बेळगाव आकाशवाणीच्या रेडिओ सिग्नलची समस्याही खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शहरातील अनेक भागांत आकाशवाणीचे सिग्नल स्पष्टपणे मिळत नसल्यामुळे नागरिकांना विविध कार्यक्रम तसेच ताज्या बातम्यांपासून वंचित राहावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या सिग्नलमध्येही तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली. हा प्रश्न संबंधित पातळीवर पुढे पाठवून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच BSNLच्या बेळगाव कार्यालयात बैठक घेऊन नेटवर्क समस्येवर सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष रविन मोदी, सचिव कमरुद्दीन सौदागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सेंट पॉल्स ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’; महिला गटात सेंट जोसेफ स्कूल विजेते

Spread the love  बेळगाव : 21व्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धा गोवावेस येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *