
EO कडून सकारात्मक आश्वासन
निट्टूर : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, निट्टूर येथे गेल्या २ ते ३ वर्षांपासून स्वयंपाक खोली (किचन शेड) व सुरक्षित वर्गखोल्या नाहीत. याबाबत ग्रामपंचायत निट्टूर यांना वारंवार लेखी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर तालुका पंचायत खानापूरचे कार्यनिर्वाहक अधिकारी (EO) श्री. रमेश मेत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले.
शाळेत सध्या १ ली ते ७ वी पर्यंत सात वर्ग असून फक्त ४ खोल्याच सुरक्षित आहेत. त्यामुळे ७ वर्गातील मुलांना ४ खोल्यांमध्ये बसवावे लागत आहे. तर मध्यान्ह भोजनाचा स्वयंपाक उघड्यावर ठेवावा लागत असून पावसाळ्यात स्वच्छतेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारल्यानंतर EO श्री. रमेश मेत्री यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबंधित अभियंत्यांना तात्काळ शाळेची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, येत्या काही दिवसांतच स्वयंपाक खोली व अतिरिक्त वर्गखोल्या मंजूर करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले असल्याची माहिती एसडीएमसी सदस्यांनी दिली.
यावेळी निवेदन देताना रुद्रप्पा पाटील, नागराज देसाई, संतोष चोपडे, गजानन गुरव, परशराम नारायण पाटील, जोतिबा मुतगेकर, मारुती नार्वेकर, कल्लाप्पा सुतार, परशराम कल्लाप्पा पाटील, दिलीप पाटील, चेतन पाटील, शेखर पाटील आदी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आश्वासनामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta