Tuesday , September 1 2026
Breaking News

खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीची आढावा बैठक

Spread the love

 

खानापूर : तालुका पंचहमी गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीची आढावा बैठक अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनांची माहिती घेऊन सदस्यांनी विविध समस्या व प्रलंबित कामांबाबत सूचना केल्या.

गृहलक्ष्मी योजनेबाबत माहिती देताना खानापूर तालुक्याचे सीडीपीओ विक्रम के. बी. व सुपरवायझर मंजुळा टोने यांनी सांगितले की, तालुक्यात गृहलक्ष्मी योजनेच्या ६०८ लाभार्थी महिलांचे निधन झाले आहे. त्यापैकी १५९ महिलांच्या सुनांनी स्वतःच्या नावाने नवीन अर्ज करून योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित ४४९ मृत लाभार्थी महिलांच्या नावावर बँक खात्यांमध्ये सुमारे १२ लाख रुपये, तर पोस्ट खात्यांमध्ये ४.२० लाख रुपये जमा झाले आहेत.

यापैकी २ लाख ४८ हजार ८०० रुपये सरकारकडे परत करण्यात आले असून, उर्वरित रक्कम परत करण्यासाठी संबंधित बँकांना पत्रे पाठविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या खानापूर तालुक्यात गृहलक्ष्मी योजनेचे ६३,६८२ लाभार्थी असून त्यांच्यासाठी दरमहा सुमारे ७२ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपये निधी येत असल्याची माहिती देण्यात आली.

चोर्ला बससेवेचा प्रश्न ऐरणीवर

शक्ती योजनेबाबत खानापूर आगाराचे नियंत्रक दुर्गावी यांनी माहिती देताना सांगितले की, जुलै महिन्यात तालुक्यातील महिलांनी ६ लाख ४० हजार ५७६ मोफत प्रवास केले असून त्यांच्या तिकिटांची एकूण रक्कम १ कोटी ७० लाख ८५ हजार २४६ रुपये झाली आहे.

यावेळी गॅरंटी योजना समितीच्या सदस्या प्रियांका गावकर यांनी चोर्ला बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? असा सवाल केला. त्यावर नियंत्रक दुर्गावी यांनी येत्या दोन-तीन दिवसांत चोर्ला बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

प्रियांका गावकर गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक मासिक बैठकीत चोर्ला बससेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने मांडत आहेत. अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनीही दोन-तीन दिवसांत बससेवा सुरू न झाल्यास हा विषय राज्य गॅरंटी योजना अध्यक्ष रेवण्णा यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

गृहज्योती योजनेत ६,६१२ प्रकरणे प्रलंबित

गृहज्योती योजनेबाबत अधिकारी प्रवीण बरगाळे यांनी माहिती देताना सांगितले की, ऑगस्ट महिन्यात तालुक्यात सुमारे २ कोटी २० लाख रुपयांचे वीज बिल माफ झाले आहे. तालुक्यात अद्याप ६,६१२ गृहज्योती लाभार्थींची पुनर्रचना करणे बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी समिती सदस्य रुद्राप्पा पाटील यांनी माळ अंकले येथील ट्रान्सफॉर्मर (टीसी) स्थलांतराचा प्रश्न उपस्थित केला. ईदलहोंड शाळेजवळील माळ अंकले येथे असलेल्या टीसीमुळे बसला माळ अंकले रोडवरून ये-जा करताना अडचण निर्माण होत असल्याने टीसी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली.

सदस्या दीपा पाटील यांनी गृहज्योती योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सदस्यांना माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली. त्यावर प्रवीण बरगाळे यांनी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना गॅरंटी योजना समितीच्या सदस्यांचे मोबाईल क्रमांक देऊन ई-केवायसीबाबत त्यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सांगितले.

हत्तींच्या सुरक्षेसाठी खर्चाचा हिशोब मागितला

समिती सदस्य प्रकाश मादार यांनी गेल्या वर्षी जंगलातील हत्तींना वीजप्रवाहाचा धोका होऊ नये, तसेच वीजवाहिन्या व खांब बदलण्यासाठी सरकारकडून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या निधीतून ७ मीटरचे खांब काढून किती ९ मीटरचे खांब बसविण्यात आले आणि आतापर्यंत किती निधी खर्च झाला, याची लेखी माहिती सप्टेंबर महिन्याच्या बैठकीत सादर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वीजपुरवठ्याशी संबंधित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सणाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

बैठकीला आहार विभागाचे शिरस्तेदार शरणाप्पा बागेवाडी तसेच फूड इन्स्पेक्टर अनुपस्थित होते. शरणाप्पा बागेवाडी यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात आले. अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी तसेच कार्यदर्शी रमेश मैत्री यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांच्या या अनुपस्थितीबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त करत निष्काळजीपणाचा आरोप करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच याबाबत नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी सर्वानुमते केली.

बैठकीला गॅरंटी योजना समितीचे सदस्य रुद्राप्पा पाटील, विवेक तडकोड, दीपा पाटील, प्रकाश मादार, प्रियांका गावकर, शांताराम गुरव, इसाखान पठाण, जगदीश पाटील, युसूफ हारगी, संजय गावडे, राजा कुडाळे, गोविंद पाटील तसेच कार्यदर्शी व तालुका पंचायत अधिकारी रमेश मैत्री उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर सोमवारी सर्वपक्षीय बैठक; आमदार हलगेकरांचा पुढाकार

Spread the love    खानापूर : खानापूर तालुक्यासह शहरातील विविध प्रलंबित समस्या आणि विकासकामांना गती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *