

कुटुंबाचे पालकत्व सरकारने घ्यावे, ठराव मंजूर
खानापूर : खानापूर तालुका निवृत्त मराठी शिक्षक संघाची मासिक बैठक शुक्रवारी संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात अध्यक्ष डी. एम. भोसले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सांगली-कुपवाड येथे हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या हत्येप्रकरणी आरोपी फरिद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मृत दाम्पत्याच्या कुटुंबाचे पालकत्व महाराष्ट्र सरकारने स्वीकारावे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी ए. आर. मुतकेकर यांनी प्रास्ताविक केले. केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघाच्या सदस्यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि पीडित कुटुंबाला शासनाने आवश्यक ती मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, कै. गोपाळ गावडे कोलिक यांच्या पत्नीला पेन्शन लागू करण्याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला. तसेच कणकुंबी येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डी. एम. भोसले, सचिव ए. एम. पाटील आणि सभासद एम. के. काकतकर या तीन शिक्षक सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बी. एन. पाटील, जे. बी. पाटील, एम. पी. कदम, जी. डी. देसाई, वाय. बी. पाटील, व्ही. यू. देसाई यांच्यासह उपस्थित शिक्षक सभासदांनी वाढदिवसाच्या सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.
एन. जे. गुरव यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta