Saturday , August 29 2026
Breaking News

मरणहोळ येथे बिबट्याचा म्हशीच्या रेडकावर हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Spread the love

 

दड्डी : मरणहोळ, ता. बेळगाव येथे शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जंगलालगत शेतात चरण्यासाठी सोडलेल्या म्हशीच्या दीड ते दोन वर्षांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे मरणहोळ परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी मारुती पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे जंगलालगत असलेल्या शेताच्या कडेला चरण्यासाठी सोडली होती. जनावरे चरत चरत पुढे गेल्यानंतर काही वेळाने त्यातील एक रेडकू अचानक धावत मागे आले. रेडकू अचानक परत का आले, हे सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, त्याच्या मानेवर पंज्याच्या ओरखड्यांच्या खुणा व रक्त दिसून आल्याने बिबट्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.

परिसरात यापूर्वीपासूनच बिबट्याची भीती असल्याने मारुती पाटील यांनी सतर्क होऊन आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील शेतात काम करत असलेले चंद्रकांत शिवाजी ऐवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेडकाच्या मानेवर बिबट्याच्या पंज्याच्या खुणा दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत ऐवाळे यांच्या शेतातील घराजवळ असलेल्या कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला करून त्याला ओढत नेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भीती आधीपासूनच होती.

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीनंतर हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे सांगण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. तसेच, नागरिकांनी सावध राहावे आणि जंगलालगतच्या भागात एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, जवळच असलेल्या हेब्बाळ-जळद्याळ परिसरातील ईर माळावर गवत कापण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांनाही बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मरणहोळसह परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

गडहिंग्लज, चंदगड आणि हुक्केरी या तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागात बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत कुत्रे व जनावरांवर हल्ले झाल्याने आता शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी

बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात वनविभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.

जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करणारे शेतकरी, गवत कापण्यासाठी जाणारे नागरिक तसेच पशुपालक यांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बिबट्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोट मराठी शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा

Spread the love  दड्डी : कोट येथील मराठी प्राथमिक शाळेत जागतिक निसर्ग संवर्धन दिन विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *