

बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा विचार करून सध्याच्या शिक्षक भरती अधिसूचनेचा तातडीने फेरआढावा घेऊन मराठी माध्यमासाठी स्वतंत्रपणे शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षक भरतीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अधिसूचनेमध्ये मराठी माध्यमाच्या पदांबाबत अन्याय झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खानापूर तालुक्यातच सुमारे १९५ मराठी शिक्षकांची कमतरता असून, संपूर्ण कर्नाटकात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अंदाजे ५८० ते ६५० शिक्षकांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचेही सांगण्यात आले.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रत्यक्षात रिक्त असलेल्या शिक्षक पदांचा सध्याच्या अधिसूचनेत समावेश करण्यात यावा. त्यासाठी विद्यमान अधिसूचनेचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास ती रद्द करून सुधारित अधिसूचना जारी करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि संबंधित भाषिक माध्यमाचे ज्ञान असलेल्या पात्र उमेदवारांना समान संधी मिळेल, अशा पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी. RTE कायदा २००९ अंतर्गत आवश्यक शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर पूर्ण करण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
संविधानातील अनुच्छेद ३५०-ए तसेच RTE कायद्याची उद्दिष्टे लक्षात घेऊन भाषिक अल्पसंख्याकांच्या मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने पार पाडावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या मागणीचा त्वरित पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भात शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
निवेदन देताना गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे बेळगाव जिल्हा सचिव महांतेश कोळूचे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta