Saturday , August 29 2026
Breaking News

चापगावसह चार गावांसाठी नवीन बससेवा सुरू; विद्यार्थी, शेतकरी व नोकरदारांना दिलासा

Spread the love

 

 

खानापूर : चापगावसह यडोगा, कारलगा आणि लालवाडी परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची बससेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि गॅरंटी योजना समितीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे खानापूर बस आगारातून खानापूर–चापगाव मार्गावर दैनंदिन नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे.

या बससेवेचा शुभारंभ चापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. गॅरंटी योजना समितीचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बसचे पूजन करण्यात आले.

दररोज सकाळी १०.३० वाजता खानापूर बस आगारातून बस सुटणार असून, यडोगा मार्गे सकाळी ११ वाजता चापगाव येथे पोहोचणार आहे. त्यानंतर चापगावहून कारलगा व लालवाडी मार्गे ही बस पुन्हा खानापूरकडे धावणार आहे.

बससेवा सुरू करण्यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर, सूर्यकांत कुलकर्णी तसेच खानापूर बस आगार प्रमुख संतोष बेनकीनकोप यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. यावेळी बसचालक किरण आणि वाहक बसेर अहमद यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

नवीन बससेवेमुळे चापगाव, यडोगा, कारलगा आणि लालवाडी परिसरातील नागरिकांना खानापूर शहराशी नियमित दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार तसेच विविध शासकीय व खासगी कामांसाठी खानापूरला ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील दळणवळणाच्या समस्येकडे लक्ष देऊन बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि सूर्यकांत कुलकर्णी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण गोदी, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती चोपडे, नागराज यळूरकर, नजीर सनदी, हनुमंत मादार, माजी सभापती सयाजी पाटील, महादेव दळवी, मष्णू चोपडे, रामा कदम, रवींद्र पाटील, पिराजी मादार, कृष्णाजी पाटील, अर्जुन पाटील, लक्ष्मण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाविरोधात खानापुरात विराट मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

Spread the love  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील रहिवासी मोहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *