

बेळगाव : पर्यावरण संवर्धन आणि हरित बेळगावच्या उद्देशाने रेसकोर्स मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या वतीने जून, जुलै आणि ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत विविध फळझाडांच्या तब्बल १०,२५३ बिया गोळा करून त्या रेसकोर्स परिसर तसेच इतर जंगल भागात पेरण्याचा संकल्प करण्यात आला होता. हा संकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत आंबा, फणस, जांभूळ, सीताफळ, चिंच, पपई, आवळा आदी फळझाडांच्या बिया संकलित करण्यात आल्या. संकलित बिया रेसकोर्स बेळगाव तसेच इतर वनक्षेत्रात पेरण्यात आल्या. भविष्यात या बियांपासून नैसर्गिकरीत्या झाडांची निर्मिती होऊन नागरिकांना आणि पर्यावरणाला त्याचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या बीजसंकलन व बीजरोपण उपक्रमाचे सूत्रधार अॅड. मारुती कामाण्णाचे यांचा मॉर्निंग वॉकर्स ग्रुप रेसकोर्स बेळगावच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कर्नाटक रत्न तसेच कर्नाटक सरकारकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त शिवाजी कागणीकर सर आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट हारगुडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोघांचाही ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मॉर्निंग वॉकर्स ग्रुपचे सदस्य रेनॉल्ड डिसोजा, बबन वानखडे, कलमनी, प्रभाकर रेवणकर, शंकर गानगीर, अशोक तरळे, अशोक भुसारी, विजय सांबरेकर, क्षितिज सांबरेकर, सौ. सांबरेकर, राणे, डॉ. पाटील, विजय कंग्राळकर, अनिल नावगेकर आणि समीर अनगोळकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, पर्यावरण संवर्धनाची ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. जून, जुलै आणि ऑगस्ट २०२७ या कालावधीत तब्बल २५ हजार बियाणे गोळा करून ती विविध जंगल परिसरात पेरण्याचा नवा संकल्प मॉर्निंग वॉकर्स ग्रुपने केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta