Monday , August 17 2026
Breaking News

सापाच्या दंशाने शट्टिहळ्ळीत बैल दगावला

Spread the love

 

 

 

दड्डी : हुक्केरी तालुक्यातील शट्टिहळ्ळी येथे सापाच्या दंशामुळे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा सर्जा बैल दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी लक्ष्मण भागोजी आसदे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी बैलगाडीतून नाचणीची लागवड करण्यासाठी शेताकडे गेले होते. त्यांच्यासोबत घरातील व शेजारच्या दोन महिला देखील कामासाठी गेल्या होत्या. पावसाळ्यामुळे बैलगाडी रस्त्याच्या कडेला ठेवून दोन्ही बैलांना शेजारच्या पडीत जागेत बांधण्यात आले. त्यानंतर महिला लागवडीच्या कामाला गेल्या, तर लक्ष्मण आसदे हे जवळील शेतात गवत कापण्यासाठी गेले.

काही वेळानंतर बैल आणण्यासाठी गेले असता, एका बाजूचा बैल दिसत नसल्याने त्यांनी शोध घेतला. जवळ जाऊन पाहिले असता बैल जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळला. त्याची जीभ बाहेर आली होती, पोट फुगले होते आणि तोंडातून फेस येत होता.

घटनेची माहिती मिळताच दड्डी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तपासणीदरम्यान बैलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले असता सापाच्या दंशामुळेच बैलाचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यात आली.

या वेळी ग्रामस्थ रानबा कालकुद्रे, समीर कांबळे, बाबू पाटील, यल्लप्पा तेलगे, समीर नारोबाचे, सुशांत कळविकट्टे, बाळू तेलगे, सुरेश तेलगे, हनमंत कुंभार यांच्यासह अनेकांनी बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी मदत केली.

विशेष म्हणजे, याच शेत परिसरात गेल्या महिनाभरात सापाच्या दंशामुळे जनावराचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना असल्याने शट्टिहळ्ळी आणि दड्डी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी अनुभवला पालखी सोहळा

Spread the love  घटप्रभा हायस्कूल, प्राथमिक शाळा व अंगणवाडीचा भक्तिमय उपक्रम दड्डी : सलामवाडी (ता. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *