Monday , August 17 2026
Breaking News

विनय कुलकर्णी यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर

Spread the love

 

बेंगळुरू : भाजप नेते योगेश गौडर हत्या प्रकरणात दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी आमदार विनय कुलकर्णी यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हुबळी-धारवाड खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे.

न्यायमूर्ती मोहम्मद नवाज आणि न्यायमूर्ती जी. बसवराजू यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने कुलकर्णी यांना ५ लाख रुपयांचा वैयक्तिक हमीबॉन्ड तसेच तितक्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय तपासात सहकार्य करणे बंधनकारक असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात खासदार आणि आमदारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने १६ एप्रिल २०२६ रोजी विनय कुलकर्णी आणि अन्य १५ जणांना दोषी ठरवले होते. त्यानंतर १७ एप्रिल रोजी सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोषी ठरल्यानंतर कर्नाटक विधानसभेने कुलकर्णी यांची आमदारकीही रद्द केली होती.

हे प्रकरण १५ जून २०१६ रोजी धारवाड येथील व्यायामशाळेत भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य योगेश गौडर यांच्या झालेल्या हत्येशी संबंधित आहे. २०१९ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने २०२० मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात कुलकर्णी यांना कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.

कुलकर्णी यांना यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र साक्षीदारांवर दबाव आणल्याच्या आरोपानंतर तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाल्याचे नमूद करत त्यांना पुन्हा जामीन मंजूर केला होता. आता उच्च न्यायालयाने शिक्षेलाच स्थगिती देत त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *