


निपाणीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : एआयसीसीकडून कर्नाटकात जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. पक्षाचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच काँग्रेसचा चिकोडी जिल्हा अध्यक्ष निवडला जाईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे निरीक्षक डॉ. के जयकुमार यांनी दिली.
निपाणीत शुक्रवारी (ता.३१) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात आयोजित बैठकीतते बोलत होते.
डॉ. जयकुमार म्हणाले, अध्यक्षपदासाठी कोणताही इच्छुक कार्यकर्ता अर्ज करू शकतो. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जाऊन तेथील ब्लॉक अध्यक्ष, आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल व त्यांची मते जाणून घेतली जातील. काँग्रेस पक्षाने नेहमीचसर्व जाती-धर्माच्या नेत्यांना सोबत घेऊन पक्षसंघटन मजबूत केले आहे. तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये आम्ही पक्षासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनाच अध्यक्ष आणि पदाधिकारी म्हणून संधी दिली आहे.

जिल्हा अध्यक्ष निवडण्यासाठी सर्वांचीच मते संग्रहित केली जात आहेत. चिकोडी जिल्ह्यातील आठही मतदारसंघात बैठका घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे वेणूगोपाल, राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यापर्यंत अभिप्राय पाठवून जिल्हाध्यक्ष निवड केली जाईल, असे सांगितले. माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर -पवार यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी विधान परिषद सदस्य पी. व्ही. मोहन जनरल सेक्रेटरी सुनील हनमन्नवर, चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुजय पाटील, बेळगाव जिल्हा गॅरेंटी अनुष्ठान प्राधिकरणचे उपाध्यक्ष अमोल बन्ने, किरण पाटोळे, प्रतीक शहा, प्रमोद पाटील अरुण आवळेकर, बाळासाहेब कमते, जीवन घस्ते यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta