Monday , August 17 2026
Breaking News

शिरगुप्पी ते ऑस्ट्रियापर्यंत संशोधकाची आकाशाला गवसणी

Spread the love

 

प्रेरणादायी प्रवासाबद्दल भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन तर्फे सत्कार

निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी या छोट्याशा गावातून आकाश आनंदा कुंभार यांनी जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी घेतली आहे. ऑस्ट्रियातील टेक्निकल विद्यापीठात त्यांची संशोधनासाठी निवड झाली आहे. त्यांची ही गरुडझेप लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे परिसरात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आकाश कुंभार यांच्या निवडी निमित्त निपाणी येथील भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक सत्कार करण्यात आला.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले, उपाध्यक्ष सुरेश घाटगे, आनंदा कुंभार यांचे कुटुंबीय उपस्थित होते. आकाश कुंभार यांना गुलाबरोप व पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. आकाशचे वडील आनंदा कुंभार हे शिरगुप्पी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. गावातील संस्थेत काम करणे, टाटा मॅक्सिमो वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण करणे अशा विविध कामांतून त्यांनी सुमारे १५ ते १६ लाख रुपये मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केले आहे. आजही ते साध्या कौलारू घरात वास्तव्यास असून शिक्षणावरील त्यांचा विश्वास आणि त्याग यामुळेच आकाशच्या यशाचा पाया भक्कम झाला.
आकाश कुंभार यांनी मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुननगर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. दहावीमध्ये ९४.२० टक्के बारावीमध्ये ९४.८३ टक्के जेइइ मध्ये ९६.७९ टक्के गुण मिळवले होते. देशातील अव्वल १००० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवत त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर IISER, पुणे येथे BS–MS एकात्मिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल सुरू ठेवली. पुणे येथे त्यांनी Electrochemical Energy Storage, Sodium-ion Batteriesआणि Renewable Energy Technologie या विषयांवर संशोधन केले. आता TU Wien, Austria येथे Redox Flow Batteries साठी Hybrid Electrolytes विकसित करण्याच्या संशोधनासाठी त्यांची निवड झाली आहे. स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते.
शिक्षणाबरोबरच राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, नेतृत्व, संशोधन, VIT वेळलोर येथील राष्ट्रीय विज्ञान परिषदेत प्रथम क्रमांक, Indian Science Festivalमध्ये देशातील Top-15 Finalistsमध्ये स्थान मिळवून आकाश यांनी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व सिद्ध केले आहे.
यावेळी बोलताना नामदेव चौगुले म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून चिकाटी, परिश्रम आणि संशोधनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे आकाश कुंभार. त्यांच्या यशामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, संशोधन आणि उच्च शिक्षणाची नवी प्रेरणा निर्माण होईल.
शिरगुप्पीच्या मातीतून उगवलेला हा ज्ञानदीप आज ऑस्ट्रियातील संशोधनविश्वात तेजाने झळकू लागला असून, आकाश कुंभार यांची यशोगाथा संपूर्ण ग्रामीण भागासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची ठरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *