Monday , August 17 2026
Breaking News

करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल नको : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Spread the love

कोल्हापूर (जिमाका) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला बाधा येणार नाही अशा पद्धतीने पुरातत्व विभागाने या मंदिरा संदर्भातील कामकाज करावे असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

गेली काही दिवस मंदिराच्या अनुषंगाने माध्यमांमध्ये नकारात्मक वृत्त प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधिताची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार अमल महाडीक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळूंखे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, मंदिर ही वास्तू असली तरी त्यावर लाखों भाविकांची श्रद्धा आहे, या मंदिरामध्ये भक्तांच्या भावना गुंतलेल्या आहेत. मंदिराचे जतन आणि संवर्धन करत असताना  पुरातत्व विभागाने याबाबत नियमांच्या पलिकडे जाऊन त्याचा विचार करावा. तसेच कामाचा वेग वाढवून नवरात्र उत्सवापूर्वी अधिकाधिक कामे वेगाने पूर्ण करावीत मात्र ती करत असताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. गरुड मंडपाची उभारणीही वेळेत करावी असे निर्देश दिले.त्याचबरोबर किरणोत्सवाला कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही केली.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंदिर आराखड्यांतर्गत येणाऱ्या मिळकतींची माहिती दिली. भूसंपादनासाठीच्या पहिल्या टप्प्यात ८९ नागरी, १९५ व्यावसायिक तर ५३ मिश्र अशा स्वरुपाच्या मिळकती आहेत या मंदिर परिसरात असल्याचे सांगून याबाबत मिळकत धारकांसोबत चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. तर पुरातत्व विभागाकडून मंदिराचे जतन आणि संवर्धन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन पाळूनच केले जात असल्याचे श्री. विलास वाहने यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यावेळी इतर अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *