
बंगळूर : शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ३१ बांगलादेशी नागरिकांना हद्दपारीच्या प्रक्रियेसाठी पश्चिम बंगालमधील मालदा येथे रवाना करण्यात आले आहे. बंगळुरातील विविध १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ताब्यात घेण्यात आलेल्या या नागरिकांना सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल रेल्वे स्थानकावरून कडक पोलीस बंदोबस्तात रेल्वेने पाठविण्यात आले.
प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक या ३१ जणांसोबत रवाना झाले आहे. हे पथक पश्चिम बंगालमधील मालदा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर अधिकृत हद्दपारी प्रक्रियेतील पुढील टप्पे संबंधित अधिकारी पूर्ण करणार आहेत.
बंगळुर शहर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन मुक्त’ या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक सिटी आणि व्हाईटफिल्ड विभागांसह शहरातील विविध भागांत ५०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २३ विशेष पथकांनी एकाच वेळी कारवाई केली होती. या पथकांनी ३० हून अधिक तात्पुरत्या शेड्स तसेच बांधकाम सुरू असलेल्या परिसरांची तपासणी केली.
या मोहिमेदरम्यान १,९०० हून अधिक संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या आधार कार्ड, पासपोर्ट आणि व्हिसासह अन्य कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये बेगूर, परप्पन अग्रहार आणि व्हाईटफिल्ड परिसरात आढळलेल्या ३१ बांगलादेशी नागरिकांच्या हद्दपारीचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, बेकायदेशीर स्थलांतरितांना कोणतीही योग्य पडताळणी न करता भाड्याने शेड किंवा घर उपलब्ध करून देणाऱ्या मालकांविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा इलेक्ट्रॉनिक सिटीचे डीसीपी एम. नारायण आणि व्हाईटफिल्डचे डीसीपी सैदुल अदावत यांनी दिला आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
बंगळुर शहर पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंह यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या संशयित व्यक्तींबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तातडीने पोलिसांना द्यावी. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये किंवा सामाजिक माध्यमांवर अनावश्यक अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक सिटी विभागाचे डीसीपी एम. नारायण यांनी सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ जणांना मालदा येथे नेण्यात येत असून, तेथे हद्दपारीच्या नियमांनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta