
निपाणी (वार्ता) : आडी (तालुका निपाणी) येथील संजीवनगिरी वरीलश्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरत असते. आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हजारो भाविकांनी श्री मल्लिकार्जुन शिवलिंगाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांच्या अलोट गर्दीत, हर हर महादेवाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात श्रावण तिसऱ्या सोमवारची यात्रा पार पडली.
पहाटे ४ वाजता शोडषोपचार विधिवत शिवलिंगाची पूजा व महाअभिषेक करून सहस्त्रनामावलीसह अकरा हजार बेल, फुले, मुग अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. बेल, फुले अर्पण करण्यासाठी भाविकांना पांढरी वस्त्रे परिधान करून सोहळ्याने मलिकार्जुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला. या संधीचा लाभ घेऊन हजारो भाविकांनी शिवलिंगावर बेल फुले व मुग अर्पण केले. श्री भ्रमरांबिका देवी मंदिरामध्ये सुद्धा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
यावेळी श्री दत्त मंदिरामध्येही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अभिषेक प्रसादाचा, भगर प्रसादाचा लाभ घेतला. दुपारी साडे बारा वाजता आडी गावातून डोंगरावरती श्री मल्लिकार्जुन पालखीचे आगमन झाले. मंदिरा भोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी खारीक, खोबरे तसेच नगारखान्यावर नारळ उडवून वपरंपरा भाविकांनी जोपासली. हजारो भाविकांनी हर हर महादेव, असा घोष करत श्री शिवशंभोचे रांगेत राहून दर्शन घेतले. यावेळी विशेष दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. पुजेचे साहित्य, खेळणी, मिठाई, आईस्क्रीम, भेळपुरी आदी आलेल्या दुकानांचा भाविकांनी लाभ घेतला.
भाविक डोंगराच्या पूर्वेकडून पायरी पायऱ्यांद्वारे डोंगर चढत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत शिव लिंगाचे दर्शन घेतले. दुचाकी आणि चार चाकी वाहनांना ही डोंगरावरती जाण्यास आणि पार्किंग करण्याची सोय करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता श्री मल्लिकार्जुन पालखीचे आडी गावात आगमन झाले.
यावेळी महिला भाविकांनी पाण्याच्या घागरी अर्पण करून स्वागत केले. श्री महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी गावच्या मध्यस्थानी मलिकार्जुन चौकात हालगीच्या तालावर पारंपारिक पद्धतीने सासनकाठ्या नाचविण्यात आल्या. देवस्थान कमिटीच्या आणि निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या यात्रेला निपाणी आगारातून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आडी, बेनाडी, कोगनोळी, सौंदलगा, कागल, निपाणी, हुपरी,आदी परिसरातील भाविकांसह कर्नाटक महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

Belgaum Varta Belgaum Varta