


एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणुकीचा संशय; टप्प्याटप्प्याने खात्यातून रक्कम लंपास
बेळगाव : मोबाईल हॅक करून बँक खात्यातील रक्कम परस्पर लंपास करण्याचे प्रकार सुरूच असून, हंगरगा (ता. बेळगाव) येथील एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. आपल्या नकळत खात्यातून रक्कम वळती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित तरुणाला मोठा धक्का बसला.
सुभाष परशुराम कांबळे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते व्यवसायाने प्लंबर कंत्राटदार आहेत. १४ सप्टेंबर रोजी त्यांच्या बँक खात्यातून सुरुवातीला २८ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी टप्प्याटप्प्याने व्यवहार करत एकूण १ लाख ७५ हजार रुपये हडप केले.
मोबाईलमध्ये एपीके फाईलच्या माध्यमातून अथवा अन्य कोणत्यातरी सायबर पद्धतीने प्रवेश मिळवून ही फसवणूक करण्यात आल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यवहारांची माहिती मिळेपर्यंत सुभाष कांबळे यांना आपल्या खात्यातून रक्कम काढली जात असल्याची कल्पनाही नव्हती.
फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधला. त्यानंतर शहर सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, एपीके फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडणे, बनावट लिंक पाठविणे तसेच ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास झटपट व मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद गुंतवणूक संदेशांपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

Belgaum Varta Belgaum Varta