Friday , October 23 2026
Breaking News

२४ तास पाणी योजनेची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची माजी नगरसेवक संघटनेची मागणी

Spread the love

 

आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

बेळगाव : शहर व उपनगरांमध्ये आठ-आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असतानाही अनेक प्रभागांतील पाणीसमस्या कायम असल्याने माजी नगरसेवक संघटनेने बुधवारी केयूआयडीएफसी व एल अँड टीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उर्वरित प्रभागांतील २४ तास पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करून किमान जाहीर वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा करावा; अन्यथा महापौर व मनपा आयुक्तांची भेट घेऊन धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक संघटनेने निवेदनाद्वारे देण्यात आला.

शहरातील ५८ प्रभागांपैकी केवळ १० प्रभागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४८ प्रभागांमध्ये अद्याप पाणीसमस्या कायम असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. राकसकोप व हिडकल जलाशयातून शहराला पाणीपुरवठा केला जात असतानाही नागरिकांना पाण्यासाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. नवीन नळजोडण्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसून, अनेक भागांत पाण्याचा दाब अत्यंत कमी आहे. त्यातही केवळ तासभर पाणी सोडले जात असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यातच पाणीपुरवठ्याची ही स्थिती असेल, तर मे-जूनच्या तीव्र उन्हाळ्यात शहराची अवस्था काय होणार?, असा सवालही माजी नगरसेवकांनी उपस्थित केला. पाणीसमस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली.

२४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत जाहीर वेळापत्रकानुसार किमान नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा. त्यासाठी आवश्यक त्या तात्पुरत्या उपाययोजना महापालिका व संबंधित यंत्रणांनी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असताना नागरिकांकडून मात्र पूर्ण महिन्याचे पाणीबिल वसूल केले जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने महापौर व मनपा आयुक्तांची भेट घेऊन तीव्र निषेध नोंदविण्यासह मनपाविरोधात धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुंठकर, सचिव दीपक वाघला, मालोजी अष्टेकर, प्रकाश शिरोळकर, रेणू किल्लेकर, वंदना बेळगुंदकर, सुनील बाळेकुंद्री, रणजीत चव्हाण-पाटील, यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *