


मराठी अस्मिता, मराठी शाळा आणि सीमाप्रश्नासाठी एकजुटीचा निर्धार; भालकी, बिदर, एकंबा, औराद परिसरातील मराठी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
भालकी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने बिदर-भालकी जिल्ह्यातील मराठी भाषिकांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेली ‘मराठी सन्मान यात्रा’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. भालकी, बिदर, एकंबा, औराद तसेच संतपूर परिसरातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या संरक्षणासाठी आपली एकजूट दाखवून दिली.
मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून ही यात्रा मार्गस्थ झाली. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगज्योती बसवेश्वर महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले मराठी बांधव यामुळे संपूर्ण वातावरण मराठीमय झाले होते. शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर यात्रेची सांगता जाहीर सभेने झाली.
मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल : डॉ. मारुतीराव मुळे
जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी दिनेश मुदाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके तसेच बसवकल्याण विधान परिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. मारुतीराव मुळे म्हणाले की, मराठी शाळा टिकविण्यासाठी मराठी भाषिक म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती टिकेल; अन्यथा भविष्यात आपण आपले सर्वस्व गमावून बसू. मराठी शाळांच्या संरक्षणासाठी येत्या काळात विशेष बैठक आयोजित करून ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
बिदरपासून मिळालेली ऊर्जा सीमालढ्याला नवे बळ देणारी : शुभम शेळके
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी बिदर-भालकी परिसरातील मराठी भाषिकांचे कौतुक केले.
ते म्हणाले, “बेळगावपासून जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर असतानाही बिदर परिसरातील प्रत्येक गावात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी अस्मितेविषयी असलेली प्रचंड आस्था आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. येथील मराठी बांधवांचे हे वातावरण पाहून सीमाप्रश्नासाठी आणि मराठी अस्मितेसाठी लढण्याचे आम्हाला आणखी बळ मिळाले आहे.”
बिदर-भालकी परिसरातील मराठी बांधवांची ही एकजूट संपूर्ण सीमाभागासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
“मराठीवरील अन्यायाला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ” : दिनेश मुदाळे
सभाध्यक्ष दिनेश मुदाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषिकांच्या प्रश्नांसाठी बेळगावातील मराठी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची ग्वाही दिली.
“मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवर ज्या-ज्या वेळी अन्याय होईल, त्या-त्या वेळी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहू. मराठीच्या संरक्षणासाठी आणि मराठी बांधवांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी दिनेश मुदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा अभिष्टचिंतन सोहळाही पार पडला.
मराठी शाळांचा सन्मान
मराठी भाषा आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध मराठी शाळांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. मराठी शाळांचे अस्तित्व आणि मराठी माध्यमाचे शिक्षण टिकविण्यासाठी समाजाने एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला भालकी महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुका उपाध्यक्ष हरिरंग बिरादार, कार्याध्यक्ष दिगंबर बिरादार, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, अशोक घगवे, अॅड. वैभव कुट्रे, बेळगाव शिवसेना-युवासेना प्रमुख विनायक हुलजी, देविदास पाटील, विठ्ठल पाटील, विवेकानंद फाउंडेशन ट्रस्टचे डॉ. जनार्दन, शिवआण्णा लोखंडे, बिदर जिल्हा बँकेचे माजी तालुका अध्यक्ष व बिदर जिल्हा माजी उपाध्यक्ष तथा साखर कारखाना उपाध्यक्ष किशनराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज भालकी संस्थेचे उपाध्यक्ष रामराव वरवटीकर, संभाजी ब्रिगेड बिदर जिल्हाध्यक्ष सतीश वासरे, उपाध्यक्ष दत्ता पाटील, रामराव रावणगावे, छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रतिनिधी तसेच जिजामाता महिला बिदर जिल्हाध्यक्ष मिनाक्षी ताई काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तसेच सचिन दळवी, रणजित हावळण्णाचे, रमेश माळवी, श्रीकांत नांदुरकर, हरीबसू धुळजी, विनायक पवार, राजू पाटील, निलेश काकतकर, सूरज जाधव, उमेश पाटील, परिणय कदम, विद्येश बडस्कर, ओंकार बैलुरकर, ज्ञानेश चिकुर्डे, गोविंद कुडेंकर, यल्लाप्पा पाटील, चेतन खोटे, अमोल चौगुले, विनायक कांगले, यश कदम, प्रणव घगवे यांच्यासह बिदर, भालकी, संतपूर, औराद आणि परिसरातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी सन्मान यात्रेच्या माध्यमातून बिदर-भालकी परिसरातील मराठी समाजाने केवळ आपली भाषा आणि अस्मिता जपण्याचा निर्धार व्यक्त केला नाही, तर सीमालढ्यासाठी आपली एकजूट आणि संघर्षाची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित केली.

Belgaum Varta Belgaum Varta