


कचऱ्यामुळे दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचा वावर; ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
बेळगाव : टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी परिसरात रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः सकाळी योगासने, व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन, स्थानिक नगरसेवक आणि नागरिक या तिन्ही घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.
परिसरात ठिकठिकाणी कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून, कचऱ्याच्या ठिकाणी भटकी कुत्री जमा होत आहेत. त्यामुळे नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून, कुत्र्यांमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियमित कचरा संकलन, परिसराची स्वच्छता आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियमानुसार उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. स्थानिक नगरसेवकांनीही रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. वारंवार विनंत्या आणि स्मरणपत्रे देऊनही ठोस सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागरिकांनीही नागरी शिस्त पाळणे आवश्यक
परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. घरातील कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत फेकण्याऐवजी घंटागाडीकडेच द्यावा. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याच्या नियमांचे पालन करावे. रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छता वाढते आणि भटकी कुत्री आकर्षित होतात, याचे भान नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे.
प्रशासनाची तत्परता, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि नागरिकांचे सहकार्य यांतूनच शिवाजी कॉलनी परिसर स्वच्छ व सुरक्षित होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी आणि नागरिकांनीही सार्वजनिक स्वच्छतेचे भान राखावे, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta