


दांडिया टिपऱ्या, चनिया चोली, घागऱ्यांना मागणी; दौडीच्या तयारीने शहरात उत्सवी माहोल
बेळगाव : नवरात्रोत्सवाचे वेध लागल्याने बेळगावच्या बाजारपेठा उत्सवी रंगांनी सजल्या आहेत. अवघे दोन दिवस शिल्लक असताना दांडिया नृत्याचा उत्साह, पारंपरिक दौडीची लगबग आणि खरेदीची धूम शहरात पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवासाठी आवश्यक साहित्य आणि आकर्षक पोशाख खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली असून, सायंकाळच्या वेळी बाजारपेठांमध्ये विशेष वर्दळ दिसून येत आहे.
गणपत गल्लीपासून पांगुळ गल्लीपर्यंतच्या बाजारपेठांमध्ये दांडिया टिपऱ्या, चनिया चोली, घागरे, पारंपरिक दागिने आणि मोजडींची दुकाने सजली आहेत. दौडीसाठी पांढरे कुर्ते आणि केशरी ओढण्यांना मागणी वाढली आहे. पारंपरिक वेशभूषा आणि नवरात्रोत्सवासाठीच्या खास सजावटीच्या साहित्याने बाजारपेठांना जणू उत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे.
रंगबिरंगी टिपऱ्यांसह दांडियाची तयारी
दांडिया नृत्यासाठी लागणाऱ्या टिपऱ्यांमध्ये यंदा विविध रंग, आकर्षक नक्षीकाम आणि सजावटीचे प्रकार उपलब्ध आहेत. लाकडी तसेच प्लास्टिकच्या टिपऱ्यांना पसंती मिळत आहे. दुसरीकडे, दांडिया नृत्याच्या पायऱ्या आत्मसात करण्यासाठी कार्यशाळा आणि सराव सत्रे सुरू झाली असून, विविध मंडळांमध्ये उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. उत्कृष्ट वेशभूषा, आकर्षक पोशाख आणि नृत्यकौशल्याच्या स्पर्धांमुळे तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
सोशल मीडियातून फॅशनचे नवे रंग
समाजमाध्यमांवरील नवनवीन फॅशनचा प्रभाव नवरात्रोत्सवाच्या खरेदीतही प्रकर्षाने जाणवत आहे. आकर्षक रंगसंगती, हटके नक्षीकाम आणि आधुनिक शैलीतील पोशाखांना तरुणाईची पसंती मिळत आहे. पारंपरिक चनिया चोली आणि घागऱ्यांना आधुनिक फॅशनची जोड देण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक फॅशन यांचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच खरेदीला आलेला वेग, दांडियाचा सराव आणि दौडीची तयारी यामुळे बेळगावमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या दिवसांत बाजारपेठांतील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta