


बेळगाव : येळ्ळूर, शहापूर, वडगाव, अनगोळसह परिसरातील काही भागांत यंदा बासमती, इंद्रायणी, सोनम, शुभांगी, सुपर सोनम, एमपी आणि दप्तरी यांसह विविध जातींच्या भातपिकांची लागवड करण्यात आली आहे. ही पिके कापणीच्या टप्प्यावर आली असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून, त्यातच उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने भातपिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. येत्या पंधरा दिवसांत कापणीला येणाऱ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे किमान कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरते तरी भात हाती लागेल की नाही, या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत.
या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta