


बेळगाव : माळमारुती पोलिसांनी सागर कॉलनी परिसरातील सिद्धेश्वर डोंगराजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल आणि मटका चिठ्ठ्या असा एकूण २० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
८ ऑक्टोबर २०२६ रोजी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अफताब अक्षर शानवाले (वय २२, रा. दुसरा क्रॉस, उज्वलनगर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. तो स्वतःच्या फायद्यासाठी आकड्यांवर पैसे लावून बेकायदेशीररीत्या मटका खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडून ५ हजार ३३० रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.
मटका खेळातून जमा झालेली रक्कम जिया भाई (रा. वीरभद्रनगर, बेळगाव) याच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्यानुसार दोघांविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२२/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास माळमारुती पोलीस करीत आहेत. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta