


बेळगाव : सौंदत्ती येथील श्री यल्लामा देवीचा वार्षिक उत्सव १० ते २१ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, रविवार, ११ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबर हा उत्सवाचा प्रमुख कालावधी असणार आहे. या काळात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बेळगावहून सौंदत्तीसाठी जादा बसेसची व्यवस्था केली आहे.
उत्सवाच्या प्रमुख दिवसांत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक तसेच सौंदत्ती येथील यल्लामा डोंगर परिसरातून विविध मार्गांवर विशेष बसेस धावणार आहेत. भाविकांना दर्शनासाठी जाण्या-येण्यासाठी पुरेशी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे, गर्दीमुळे प्रवासाची गैरसोय टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे, हा या व्यवस्थेचा उद्देश आहे.
उत्सवासाठी सौंदत्तीकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने भाविकांनी खासगी वाहनांऐवजी परिवहन महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव विभागीय नियंत्रकांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta