


हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती-हत्तरगी टोलनाक्याजवळ भीषण अपघात; चौघांची प्रकृती गंभीर
बेळगाव : दुर्गामाता दौड देवीची मूर्ती मिरवणुकीतून स्वग्रामाकडे घेऊन जात असताना मागून आलेल्या ट्रकने मिरवणुकीतील भाविकांना जोरदार धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर १० हून अधिक जण जखमी झाले. रविवारी हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती आणि हत्तरगी टोलनाक्याजवळ ही हृदयद्रावक घटना घडली.
हुक्केरी तालुक्यातील हुंच्यानट्टी गावातील भाविक दुर्गामातेची मूर्ती घेऊन बेळगावला आले होते. दर्शन व धार्मिक कार्यक्रमानंतर हे भाविक मूर्ती घेऊन मिरवणुकीने गावाकडे परतत होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने मिरवणुकीतील भाविकांना धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत प्रकाश, महेश आणि दानेश्वरी यांचा मृत्यू झाल्याचे समजते. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यासह इतर जखमींवर बेळगाव जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
धार्मिक मिरवणुकीदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जखमींची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Belgaum Varta Belgaum Varta