


मोटारसायकलवरून आलेल्या दोघांचे पलायन
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरांत चेन स्नॅचिंगच्या घटनांचे सत्र सुरूच असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. श्रीनगर येथे शनिवारी रात्री मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पायी घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पलायन केले. देवदर्शनाहून परतणाऱ्या महिलेवर चोरट्यांनी डाव साधल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पद्मा मंजुळा नागराज (मूळ रा. चन्नरायपट्टण, जि. हसन; सध्या रा. श्रीनगर) यांनी याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
पद्मा या शनिवारी रात्री धर्मनाथ भवन येथील बस्तीचे दर्शन घेऊन पायी घरी परतत होत्या. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अचानक हिसकावली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे पद्मा यांना धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली; मात्र नागरिक जमा होण्यापूर्वीच चोरट्यांनी मोटारसायकलवरून वेगाने घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
चेन स्नॅचिंग रोखण्याचे आव्हान
शहरात सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta