


बेळगाव : चिंचणी-रायबाग येथील रिव्हर साईड शाळेच्या मैदानावर चिकोडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील दोन्ही गटांत बेळगावच्या संघांनी विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळविला. या शानदार कामगिरीमुळे दोन्ही संघांनी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे.
मुलांच्या संघाची दमदार कामगिरी
१७ वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात संत मीरा शाळा, बेळगावच्या संघाने हावेरीचा ५-० असा धुव्वा उडविला. आराध्या नाकाडीने दोन, तर सकलेन मुल्ला, नेविन पत्की आणि समर्थ पनारे यांनी प्रत्येकी एक गोल केला. उपांत्य सामन्यात बेळगावने धारवाडचा ४-० असा पराभव केला. या सामन्यात सकलेन मुल्ला, रक्षित रामगौडा, नेविन पत्की आणि आराध्या नाकाडी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.
अंतिम सामन्यात बेळगावने बागलकोटवर पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ अशी मात केली. या विजयासह संघाने मागील पराभवाची परतफेड करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सकलेन मुल्ला, नेविन पत्की आणि रक्षित रामगौडा यांनी प्रत्येकी एक गोल केला.
मुलींच्या संघाचेही विजेतेपद
मुलींच्या गटातील उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स, बेळगाव शहरच्या संघाने हावेरीचा ४-० असा पराभव केला. वेदिका कणबरकर आणि अपेक्षा मत्तीकोप यांनी प्रत्येकी दोन गोल केले. अंतिम सामन्यात बेळगावने चिकोडीचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. प्रांजल हजेरी, तेजल हंजी आणि श्रद्धा पाटील यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. गोलरक्षक मारिया मुजावर हिने उत्कृष्ट गोलरक्षण करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
दोन्ही संघांना क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, मानस नायक, रविशंकर मालशेट, चेस्टर रोझारिओ, ज्युलेट फर्नांडिस आणि अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल आणि जाहिदा पटेल यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Belgaum Varta Belgaum Varta