Friday , October 23 2026
Breaking News

पतंगाच्या मांजाचा पुन्हा कहर; तीन दुचाकीस्वार जखमी!

Spread the love

 

कपिलेश्वर उड्डाणपुलावरील घटना; एकाच्या नाकाला गंभीर दुखापत

बेळगाव : पतंग उडविण्याचा आनंद आता दुचाकीस्वारांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. धारदार मांजामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, रविवारी सायंकाळी कपिलेश्वर उड्डाणपुलावर मांजा लागून तीन युवक जखमी झाले. यातील एका युवकाच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मांजामुळे गांधीनगर येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रविवारी सायंकाळी शहापूरहून बेळगावच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या युवकांच्या अंगाला कपिलेश्वर उड्डाणपुलावर पडलेला तुटलेला मांजा लागला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना मांजाचा अंदाज न आल्याने ते त्यात अडकले. या घटनेत तिघांच्या हातांना, चेहऱ्याला आणि नाकाला दुखापत झाली. एका युवकाच्या नाकाला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत मांजा बाजूला केला.

रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने उड्डाणपुलावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अशा गजबजलेल्या ठिकाणी मांजामुळे अपघात घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही; मात्र दुचाकीस्वारांच्या गळ्याला किंवा मानेवर मांजा लागला असता, तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती.

मृत्यूची घटना ताजी, तरीही मांजाचा धोका कायम!

धारदार मांजामुळे गांधीनगर येथील युवकाला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही. पोलिसांकडून मांजाच्या विक्रीविरोधात कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात असले, तरी छुप्या मार्गाने त्याची विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. बंदी असलेल्या मांजाचा वापर करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असल्याचे या घटनांमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

पतंग उडविण्याचा छंद जोपासताना इतरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. विशेषतः उड्डाणपूल, मुख्य रस्ते आणि वाहनांची सतत वर्दळ असलेल्या परिसरात तुटलेला मांजा अपघातांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे मांजाच्या विक्रीवर केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्षात कठोर नियंत्रण आणण्याची गरज आहे.

मांजाच्या छुप्या विक्रीवर बंदी प्रभावीपणे राबवावी, विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे. पतंगाचा आनंद दुसऱ्याच्या जीवावर बेतू नये, यासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *