Friday , October 23 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये ३८ विद्यार्थ्यांनी घेतला विज्ञान-तंत्रज्ञानाचा अनुभव!

Spread the love

 

 

कॅन्टोन्मेंट मराठी शाळा व भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद

बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, तसेच त्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन हायस्कूल, बेळगाव येथील अटल टिंकरिंग लॅबच्या वतीने ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कॅन्टोन्मेंट मराठी शाळा आणि भगतसिंग हायस्कूल, आंबेवाडी या दोन शाळांतील एकूण ३८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक घटक, उपकरणांची कार्यपद्धती आणि त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध वस्तू व उपकरणे तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. स्वतः प्रयोग करणे, इलेक्ट्रॉनिक घटक हाताळणे आणि विज्ञानातील संकल्पना कृतीतून समजून घेणे, असा अनुभव विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळाला.

या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची आवड, जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून आनंद व्यक्त केला. “आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा अनुभवण्याची संधी मिळाली,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या अनोख्या अनुभवाबद्दल त्यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मुख्याध्यापकांकडे व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा हा प्रतिसाद कार्यशाळेच्या यशाची पावती ठरला.

या कार्यशाळेसाठी अटल टिंकरिंग लॅबच्या इन्चार्ज श्वेता सुर्वेकर, स्नेहा कुपेकर, पद्मजा कुऱ्याळकर, संध्या चौगुले आणि शिवानी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील आणि शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रयोगशील शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून मराठी विद्यानिकेतनच्या अटल टिंकरिंग लॅबने इतर शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आपले ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे दालन खुले करून शैक्षणिक सहकार्याचा आदर्श निर्माण केला आहे.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, नव्या गोष्टी शिकण्याची उत्सुकता आणि भविष्यातही अशा संधी मिळाव्यात ही त्यांची मागणी, हेच या कार्यशाळेचे खरे यश ठरले. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या विश्वाची ओळख करून देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *