


निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. दररोज प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणासह घरोघरी पूजाअर्चा करण्यात येत आहे. पण दिवसा आणि रात्री विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय पिकांना पाणी देणेही शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलने, मोर्चे काढून संबंधित कार्यालयांना निवेदने देण्यात आली.मात्र, काही दिवसांतच परिस्थिती पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी आबालवृद्ध हैराण झाले आहेत. सणासुदीच्या काळातही वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सध्या नवरात्रोत्सव सुरू झाला असून सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळासह घरोघरी धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि उत्सव सुरू आहे. तरीही दिवसभरातील काही तास वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे उकाडा असह्य होत आहे. वीज नसल्याने उकाड्यापासून दिलासा मिळणेही कठीण झाले आहे. शिवाय पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta