


आंदोलकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
हत्तरगी : ऊसाला योग्य दर निश्चित करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच हत्तरगी टोल प्लाझावर एका शेतकऱ्याने वर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोल गेटजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून शेतकरी आंदोलन करत असताना ही घटना घडली. टोल प्लाझावर चढलेल्या शेतकऱ्याने खाली उडी मारण्याचा प्रयत्न करताच उपस्थित आंदोलकांनी त्याला रोखण्यासाठी धाव घेतली. शेतकऱ्याचा पाय पकडून त्याला खाली पडण्यापासून वाचवण्यासाठी आंदोलकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
दरम्यान, शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी करून संबंधित शेतकऱ्याची समजूत काढली. त्यानंतर तो सुरक्षितपणे खाली उतरला. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. नंतर नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
ऊसाला न्याय्य दर मिळावा आणि इतर मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन सुरूच आहे.

Belgaum Varta Belgaum Varta