


बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या बेळगाव भेटीला १३४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ‘विवेक आगमन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत भजन आणि प्रवचनांचा कार्यक्रम होणार आहे. बेंगळुरू येथील रामकृष्ण मठाचे स्वामी वीरेशानंद महाराज ‘स्वामी विवेकानंदांचा शक्तिशाली संदेश’ या विषयावर कन्नडमधून, तर कोल्हापूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी बुद्धानंद महाराज ‘स्वामी विवेकानंदांचे आधुनिक युगाला देणे’ या विषयावर मराठीत प्रवचन देणार आहेत. युवा गायक राजयोग धुरी यांचा भजन कार्यक्रमही होणार आहे. रात्री ८.४५ वाजता प्रसाद वितरण करण्यात येईल.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून स्वामी विवेकानंदांना अभिवादन करावे, असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे करण्यात आले आहे.
स्वामीजींच्या वास्तव्याच्या आठवणी जतन
दि. १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ या कालावधीत स्वामी विवेकानंद यांनी बेळगावात वास्तव्य केले होते. प्रारंभी काही दिवस ते रिसालदार गल्ली येथील सदाशिव भाते यांच्या घरी राहिले. त्यानंतर काही दिवस त्यांनी किल्ला परिसरातील विभागीय वन अधिकारी हरिपाद मित्रा यांच्या घरी वास्तव्य केले.
रिसालदार गल्लीतील भाते यांच्या निवासस्थानी स्वामी विवेकानंद मेमोरियल उभारण्यात आले आहे. स्वामीजींनी बेळगावातील वास्तव्यात वापरलेली खोली, कॉट आणि अन्य साहित्य या स्मारकात जतन करून ठेवण्यात आले आहे. या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘विवेक आगमन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta