


बेळगाव : ऊसदरवाढीसह विविध मागण्यांसाठी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे रोको आंदोलन तब्बल २८ तासांनंतर मागे घेण्यात आले आहे. हत्तरगी येथे महामार्गावर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा हुबळीकडे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानावर पायी मोर्चा काढून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलकांचा निर्धार आहे.
उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये करावा आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले होते.
हत्तरगी येथे सुरू असलेल्या महामार्ग रोकोमुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. आता महामार्गावरील ठिय्या मागे घेतल्याने वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.
काकती, बेळगावमार्गे हुबळीकडे कूच
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शेतकरी काकती येथे मुक्काम करून बेळगावमार्गे हिरेबागेवाडी येथे जाणार आहेत. त्यानंतर हुबळीकडे पायी मोर्चा काढून केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही ऊसदराच्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा, साखरेच्या किमान विक्री दरात वाढ व्हावी आणि इथेनॉलच्या दरात सुधारणा व्हावी, या मागण्यांवर शेतकरी संघटना ठाम आहेत.
महामार्गावरील आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पायी मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऊसदरवाढीच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta