Friday , October 23 2026
Breaking News

बेळगावच्या मुक्तिमठापासून दुसऱ्या दिवसाच्या पदयात्रेला सुरुवात; प्रल्हाद जोशी यांच्या हुबळीतील निवासस्थानापर्यंत जाणार मोर्चा

Spread the love

 

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पदयात्रेला बेळगावच्या मुक्तिमठापासून सुरुवात झाली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पदयात्रेदरम्यान एका शेतकऱ्याने शंखनाद करत लोटांगण आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

हिरवे टॉवेल फिरवत पदयात्रेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘जय जवान, जय किसान’, ‘मंत्री प्रल्हाद जोशी यांचा धिक्कार असो’, ‘शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबातील महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. ही पदयात्रा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानापर्यंत जाणार आहे.

‘आमचे दुःख दिसत नाही का?’

राज्यात दुष्काळी परिस्थिती असून जनता आणि जनावरे संकटात आहेत. अशा परिस्थितीत सर्व काही सोडून शेतकरी पदयात्रा काढत असताना लोकप्रतिनिधींना त्यांची व्यथा दिसत नाही का, असा संतप्त सवाल शेतकरी नेते चन्नया पुजारी यांनी केला.

‘आम्ही सर्व पक्षांना मतदान केले आहे. मात्र, २२४ आमदार आणि खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय करत आहेत? आमचे प्रश्न सोडवा. तुम्हा सर्वांना झाले तरी काय? आमचे दुःख दिसत नाही का?’ अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली.

समितीच्या निर्णयाचे स्वागत; मात्र दिलाशाबाबत साशंकता

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, केवळ समिती स्थापन करून शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत किंवा त्यांना तातडीने दिलासा मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष दिलासा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *