


घरातील सर्व साहित्य जळून खाक : अग्निशामक बंब आल्याने परिसरातील नुकसान टळले
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बेळगाव नाका शेजारी असलेल्या राममंदिर परिसरातील चैतन्य शशिकांत नेसरीकर यांच्या घराला गुरूवारी (ता.१५) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामध्ये घरासह संसारोपयोगी साहित्याचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. आगीच्यावेळी सुदैवाने घरात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

नेसरीकर यांच्या बंद घरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडताना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून येथील अग्निशामक दलाशी संपर्क साधला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा एक बंब आणि हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचा दुसरा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीची भीषणता अधिक असल्यामुळे सुरुवातीला अडथळे येत होते. तरीही अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि कारखान्याच्या आपत्कालीन पथकाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. तोपर्यंत घरातील फर्निचर, तिजोरीतील कपडे, रोख रक्कमआणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलीस व महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
——————————————————————–
मोठे दुर्घटना टळली
चैतन्य नेसरीकर यांच्या घराशेजारीच अनेक कुटुंबीय वास्तव्यास आहेत. नेसरीकर यांच्या घराला आग लागताच येथील अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. त्यामुळे आग आटोक्यात आणली. अन्यथा परिसरातील घरांना धोका होता. आग तात्काळ विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.

Belgaum Varta Belgaum Varta