


जयपूर येथे ५८व्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन; मनीष सरोजने पटकाविला मेन्स फिजिक्सचा किताब
जयपूर : इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५८व्या वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अभय कश्यप याने ‘मिस्टर इंडिया २०२६’चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला. तर गुजरातमधील वापी येथील मनीष सरोज याने ‘मेन्स फिजिक्स २०२६’चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळविला.
जयपूर येथील निर्मला ऑडिटोरियम हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधील सुमारे १८० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. नऊ वजनी गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
जयपूर येथील फिट लीग फिटनेस इक्विपमेंट यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजस्थान शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव शिवराम थापा यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेच्या पंचमंडळात इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव सुरेश कदम यांच्यासह बलबीर सिंग, अनिल अंबरोळे, मनोरंजन लोलिता, भावेश, अमरदीप, दिलीप मेंडिस, दर्शन सर, डॉ. बी. पी. रेड्डी, के. जी. राव, जोग किरण, रूपक विश्वास, टी. रामू, गुरुनाथ सर आणि मनोरंजन शर्मा यांनी काम पाहिले.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील शरीरसौष्ठवपटूंनी आपले कौशल्य आणि शारीरिक क्षमता प्रदर्शित केली. अभय कश्यप आणि मनीष सरोज यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta