


शिवानंद महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा भारत’ अभियान; योग आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके
कागवाड : “मादक पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनता ही केवळ व्यक्तीच्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा मूक शत्रू आहे. व्यसनांच्या विळख्यात अडकून तरुणांनी आपले अनमोल आयुष्य वाया घालवू नये. शिक्षण, क्रीडा आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवून व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन कागवाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी केले.
कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयात भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) पुढाकारातून ‘नशामुक्त युवा भारत’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), यूथ रेडक्रॉस, क्रीडा विभाग आणि विद्यार्थिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात खोत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम विशद करताना खोत म्हणाले, की अमली पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ढासळते. त्याचबरोबर कौटुंबिक संबंध, सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण आणि करिअरवरही गंभीर परिणाम होतात. व्यसनाधीनता ही तरुणांच्या प्रगतीतील मोठी धोंड ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाईट सवयींपासून दूर राहून आपला वेळ शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी द्यावा. स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच इतरांमध्येही व्यसनमुक्तीविषयी जागृती निर्माण करावी.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मेजर व्ही. एस. तुगशेट्टी यांनी विकसित भारताच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. निरोगी, शिस्तप्रिय आणि जबाबदार तरुणाई हा देशाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. युवकांनी नैतिक मूल्ये, चांगले संस्कार आणि शिस्त अंगीकारून आपली ऊर्जा विधायक कार्यासाठी वापरावी, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांनी व्यसनमुक्त तरुणाई हीच विकसित भारताची खरी ताकद असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा. अमली पदार्थांविरोधात जनजागृती करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
योग आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात प्रा. आर. एस. नागरेड्डी यांनी योगाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना विविध योगप्रकारांची प्रात्यक्षिके दाखविली. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मानसिक ताण कमी होतो, एकाग्रता वाढते आणि मनावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. निरोगी व व्यसनमुक्त जीवनासाठी योग उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
कु. उषा कोंकणी आणि कु. गणेश साळुंखे यांनी स्वसंरक्षणाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. विशेषतः विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने संकटांचा सामना करण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. बी. डी. धामण्णवर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग क्रमांक दोनचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. ए. पाटील यांनी स्वागत केले. यूथ रेडक्रॉसचे अधिकारी प्रा. एस. एस. फडतरे यांनी सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग क्रमांक एकचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर वाय. यांनी आभार मानले.
यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट प्रा. ए. आर. आलगोंडी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विविध विभागांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta