


अथणी : अथणी शहरातील जत रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध ‘ब्रह्मा एंटरप्रायझेस’ या मॉलसदृश मोठ्या दुकानाला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत फर्निचर, ब्रँडेड कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील नागरिक गाढ झोपेत असताना दुकानातून अचानक धूर बाहेर पडू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुकानातील सोफा, बेड, टीव्ही, फ्रिज, महागडे कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता लक्षात घेता पाण्याचा साठा पुन्हा भरण्यासाठी अग्निशमन वाहनाला वारंवार परत जावे लागले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा दुकानात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आगीच्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta