Friday , October 23 2026
Breaking News

हिंदवाडीतील घुमटमाळ मारुती मंदिरात भाई शंकरराव बांदकर यांचे प्रवचन

Spread the love

बेळगाव : “दसरा आणि दिवाळी हे आनंदाचे उत्सव आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि उत्साह कायम नांदावा, यासाठी असे सण साजरे केले जातात,” असे विचार जीवनविद्या मिशनचे प्रबोधनकार भाई शंकरराव बांदकर यांनी व्यक्त केले.

हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिराच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी भाई शंकरराव बांदकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान आवश्यक

“काळोख हे अज्ञानाचे प्रतीक आहे. प्रकाश आल्यावर काळोख नष्ट होतो, त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त झाल्यावर आपल्यातील अज्ञान दूर होते. जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी देवाचा साक्षात्कार करून घेणे आवश्यक आहे आणि हा साक्षात्कार सद्गुरूंच्या मार्गदर्शनातूनच होतो,” असे बांदकर यांनी सांगितले.

विजयादशमी म्हणजे दहा इंद्रियांवर विजय मिळवून देणारी तिथी, असे सांगून ते म्हणाले, “सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उठताना, बसताना, जेवताना, खाताना, पिताना, झोपताना आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती करताना नामस्मरण करावे. नामस्मरणाच्या माध्यमातून आपण अनेक संकटांवर विजय मिळवू शकतो.” विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी नवरात्रोत्सवाचे महत्त्व विशद केले.

मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त विविध कार्यक्रम

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे चिटणीस अनंत लाड यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यावर्षी घुमटमाळ मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. या उपक्रमांची सुरुवात शनिवारपासून करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष कुलदीप भेकणे आणि उपाध्यक्ष प्रकाश माहेश्वरी यांनी पाहुण्यांचा सन्मान केला. खजिनदार रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले. सौ. मधुरा शैलेश शिरोडकर यांनी जीवनविद्या मिशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त, जीवनविद्या मिशनचे नामधारक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

सामूहिक हनुमान चालीसा पठण

शनिवारी सायंकाळी मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठणाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *