


भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल; मशागत, बियाणे आणि खतांचा ३० ते ४० हजारांचा खर्च अंगावर
बेळगाव : बेळगाव परिसरातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. काही भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, तर काही भागांत पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी एकरी २,८०० रुपयांची नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
भाड्याने शेती घेणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे भाडे, मशागत, शेणखत, बियाणे, पेरणी, रासायनिक खते, औषध फवारणी, पीक कापणी आणि बांधणी यांसह विविध कामांसाठी एकरी सुमारे ३० ते ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक हातचे गेल्यास या खर्चाची भरपाई करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरते.
दुसरीकडे, पीक नुकसानभरपाई आणि पीएम किसान योजनेचा लाभ प्रामुख्याने जमिनीच्या नोंदींशी संबंधित असल्याने प्रत्यक्ष शेती करणाऱ्या भाडेकरू शेतकऱ्यांना अनेकदा या मदतीपासून वंचित राहावे लागते. परिणामी, शेतीसाठी केलेला खर्च भाडेकरू शेतकऱ्याच्या अंगावर पडतो, तर सरकारी मदत आणि काही लाभ जमिनीच्या मूळ मालकाला मिळण्याची परिस्थिती निर्माण होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने मदत द्या!
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करावेत आणि तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद घेऊन त्यांनाही नुकसानभरपाईचा लाभ मिळेल, अशी व्यवस्था सरकारने करणे आवश्यक आहे.
शेतीचा प्रत्यक्ष खर्च वाढत असताना आणि उत्पन्नाची शाश्वती नसताना केवळ तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांना सावरणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने कागदोपत्री नोंदींपलीकडे जाऊन प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. अन्यथा, जमीन कसणारा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta