Sunday , October 25 2026
Breaking News

काळा दिनाच्या निषेध फेरीसाठी बेळगाव तालुका समिती सज्ज; निवडणुकांच्या तयारीलाही वेग

Spread the love

अंतर्गत मतभेद दूर करून संघटन मजबूत करण्यावर भर

बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासह आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करण्याचा निर्धार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. मराठा मंदिर येथे माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मनोहर किणेकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत काळ्या दिनाच्या कार्यक्रमासह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.

यावेळी शिवाजी खांडेकर यांनी समितीच्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कमी उपस्थिती असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या वेळी सक्रिय होणाऱ्या कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नाच्या आंदोलनातही तितक्याच ताकदीने सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचे संघटन मजबूत करण्यासाठी विभागवार बैठका घेणे, गावागावांत पत्रके वितरित करणे आणि मराठी जनतेमध्ये सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

नारायण सांगावकर यांनी आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांचे नियोजन आतापासूनच सुरू करण्याची सूचना केली. तर पियूष हावळ यांनी समितीतील अंतर्गत मतभेद व वाद मिटवून सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

आर. एम. चौगुले यांनी १ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मराठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यासाठी विभागवार बैठका घेऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणुकांच्या तयारीबाबत १ नोव्हेंबरनंतर स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीत दीपक पावशे, मनोहर संताजी, आर. के. पाटील, राजू किणेकर, रामचंद्र मोगेकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही आपली मते मांडली.

सीमाप्रश्नाच्या लढ्याला नव्याने बळ देण्यासाठी मराठी जनतेला संघटित करणे, समितीतील मतभेद दूर करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियोजनबद्ध तयारी करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला. १ नोव्हेंबरच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात उद्या संघाचे विजयादशमी पथसंचलन

Spread the love  सरदार हायस्कूल मैदानावरून संचलनाला प्रारंभ; लिंगराज कॉलेज मैदानावर मुख्य कार्यक्रम बेळगाव : राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *