


खानापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत खानापूर शहरातील शिवस्मारक परिसर, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ, भाजी मार्केट आदी ठिकाणी पत्रकांचे वाटप करून १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी सीमाभागातील मराठी भाषिकांनी आपले उद्योगधंदे बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन समितीने केले आहे. भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगाव, निपाणी, कारवार, खानापूरसह मराठी भाषिकबहुल प्रदेश कर्नाटकात समाविष्ट करण्यात आल्याने सुमारे ४० लाख मराठी भाषिकांवर अन्याय झाल्याची भूमिका समितीने मांडली आहे.

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला असून, मराठी भाषिकांनी आपले ऐक्य कायम ठेवून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले.
शिवस्मारक येथे धरणे आंदोलन
रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी खानापूर येथील राजा छत्रपती शिवस्मारकातील कै. व्ही. वाय. चव्हाण माजी आमदार सभागृह येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
पत्रक वाटप आणि जनजागृती मोहिमेत समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, प्रकाश चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी भाषिकांनी एकजूट दाखवून १ नोव्हेंबरचा काळा दिन गांभीर्याने पाळावा आणि धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta