बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात राज्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढील महिन्यात बेळगावला भेट देणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचारात बुडालेल्या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या पाहिजे. बेळगाव जिल्ह्यात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येथील सरकार अपयशी ठरले आहे. येथील शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देण्यात येतात मात्र कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत नसल्याचे ते म्हणाले.
पुढील महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. पंजाब सरकारने उसाला ३८०० रुपये दर निश्चित केला असून याप्रमाणे कर्नाटक सरकारनेही दर दिला पाहिजे. मात्र कर्नाटकात केवळ २७०० रुपये प्रतिटन उसाला दर देण्यात येतो. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी सर्वेक्षण केले असून याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. बेळगावच्या ऊस उत्पादकांना बेंगळुरू येथे बोलावून बैठक घेण्याऐवजी बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये बोलवून बैठक घेण्याची मागणी भास्कर राव यांनी केली.
या पत्रकार परिषदेला उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपण्णावर, विभागीय समन्वयक विजय शास्त्रीमठ, जिल्हा समन्वयक शंकर हेगडे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta