बेळगाव : बेळगाव परिसरातील सुपीक शेतात चैनबाज युवक पार्टी, दारू, गांजा, जुगार यासारखे गैरकृत्य राजरोजपणे करताना दिसून येत आहेत. शहर परिसरातील युवकांमुळे शेतकरी वर्ग हैराण झाले आहेत. महिला शेतकऱ्यांना एकटीने शेतात जाणे जिकरीचे बनले आहे. पार्टी दरम्यान दारू पिणे, सिगारेट ओढणे त्यादरम्यान भांडणे झाली की दारूच्या बाटल्या फोडणे, कधी कधी भात गंजीना व गवत गंजीना आग लावण्याचेही प्रकार शेतात घडत आहेत. पार्टीदरम्यान केलेला मांसाहार उरलेलं अन्न खायला मिळते म्हणून भटक्या कुत्र्यांनी देखील शेतात ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी रयत संघटनेतर्फे वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नांदेश्वर तसेच अबकारी खात्यालाही प्रत्यक्ष लेखी निवेदन दिले होते. पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास संबंधित खाते अपयशी ठरले. त्यामुळे आता दारू, सिगारेट, गंज्या पार्ट्यांना जास्तच उत आला आहे.
पोलीस खात्याच्या “फोन इन”च्या माध्यमातून तक्रार नोंदविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र फोन काही लागत नाही. तेव्हा संबंधित खात्याने वेळीच लक्ष घालून शेतात घडणाऱ्या गैरकृत्याला आळा घालावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.