महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ”आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. आम्ही तुझ्यावर असीम प्रेम करतो, Rest in Peice असं कॅप्शन लिहित केलीने सर्व कुटुंबियांचा हात पेले याच्या हाताजवळ असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर जगभरातील फुटबॉलप्रेमी कमेंट करत असून सर्व स्तरातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
काही दिवसांपासून पेले यांचे कुटुंबिय साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात जमा झाले होते. या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने पेले यांचा हात धरलेला एक भावनिक फोटो शेअर करत ‘बाबा…. माझी ताकद तुमची आहे’ असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हाच त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर आता अखेर त्यांचं निधन झालं आहे.
फुटबॉल जगतात अनेक फुटबॉलर्सचं विश्वचषक जिंकणं स्वप्न असतं, अशामध्ये तब्बल तीन वेळा विश्वचषक विजेतेपद पटकावणारा एकमेव खेळाडू असलेले पेले अखेर हे जग सोडून निघून गेले आहेत. त्यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. याआधी म्हणजे मागील वर्षी पेले यांचा कोलन ट्यूमर काढण्यात आला होता. ज्यानंतर आता कॅन्सर उपचारासाठी पेले रुग्णालयात होते. पण मागील काही दिवसांपासून पेले केमोथेरपीला प्रतिसाद देत नव्हते. ज्यानंतर अखेर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.