Tuesday , June 2 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना शिवसेना (उबाठा)चा जाहीर पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड भाषा फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा तसेच २९ जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’समोर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही आंदोलनांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे विजय देवणे यांनी स्पष्ट केले.

सीमाभागात कन्नड भाषा फलक सक्तीच्या वाढत्या अंमलबजावणीमुळे मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, या प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या आणि कन्नड भाषा संवर्धन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजय देवणे यांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेहमीच सीमाभागातील मराठी जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनांना पक्षाचा सक्रिय पाठिंबा राहणार असून मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सीमाभागातील मराठी अस्मिता, भाषा आणि सांस्कृतिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व मराठीवादी संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘युवा द चेंज मेकर’ उपक्रमाची यशस्वी सांगता

Spread the love  बेळगाव : संस्कृती एज्युकेअरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा द चेंज मेकर’ या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *