बेळगाव : नवीन वर्षाच्या स्वागताची बेळगावात जय्यत तयारी सुरु आहे. तरुणाई आज संध्याकाळी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सज्ज झाली आहे तर ओल्ड मॅन बनवण्यात बच्चे कंपनी बिझी आहे.
गेली दोन-तीन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे बेळगावकरांना नववर्षाचे स्वागत भव्य प्रमाणात करता आले नव्हते. त्यामुळे सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. पण यंदा निर्बंधमुक्त न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. बच्चे कंपनी गल्लोगल्ली कोपर्यावर ओल्ड मॅनचे पुतळे उभारण्यात बिझी झाली आहे. बेळगाव शहर आणि परिसरात असे ओल्ड मॅन उभे केलेले दिसून येत आहेत. ओल्ड मॅन जाळण्याचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बेळगावातील कॅम्प परिसरात तयार ओल्ड मॅन प्रतिकृती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे गल्लीतच थर्टी फर्स्ट साजरा करावा लागला होता. बाहेर पार्ट्या करता आल्या नव्हत्या. मात्र यंदा मध्यरात्री 1 वाजेपर्यंत न्यू इयर सेलिब्रेशन करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टचा मनमुराद आनंद लुटण्याचा संकल्प युवकांनी केला आहे. बेळगाव शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पार्टी हॉल्स, शहराबाहेरील लौन्स देखील थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी सज्ज झाली आहेत. ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स त्यांनी जाहीर केल्या आहेत. दरम्यान, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाने चांगलीच खबरदारी घेतली आहे. नेहमीच्या गस्ती पथकांव्यतिरिक्त पोलिसांची विशेष भरारी पथकेही तैनात ठेवण्यात आली आहेत. ही पथके शहर परिसरात फिरून परिस्थितीवर नजर ठेवून असणार आहेत.