दागिने रोख रक्कम लंपास : नागरिकात भीती
कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन बंद घरात चोरी झाल्याची घटना शनिवार तारीख 31 रोजी सकाळी उघडकीस आली.
रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ नगर येथे भोपाल कोळेकर यांचे भर वस्तीत घर आहे. भोपाल कोळेकर हे मेंढपाळ असल्याने ते आपल्या बकऱ्यात गेले होते. आजी आक्कूबाई कोळेकर ह्या एकट्याच घरी होत्या. यासाठी त्यांनी पुढील दरवाजाला कुलूप लावले होते. चोरट्यानी कुलूप मोडून घरात प्रवेश करून घरात असणारी तिजोरी फोडून त्यामधील दागिने व रोख रक्कम लंपास केले. घरातील इतर साहित्य त्यांनी विस्कटून त्यामध्ये काही मौल्यवान वस्तू आहे का याची पाहणी केली आहे. इथून जवळच असणाऱ्या विठ्ठल ठेंगले यांच्या घराचे कुलूप मोडून घरात प्रवेश केला. या ठिकाणी चोरट्याने दोन पोती भुईमूग शेंगा, एक पोते वाळलेली मिरची लंपास केली.
शनिवारी सकाळी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील महिला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अज्ञात चोरट्याने बंद घरांनाच लक्ष केले आहे. भर वस्तीत चोरी झाल्याने हालसिद्धनाथ नगर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.