कुद्रेमानी साहित्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोपण
कुद्रेमानी : सीमाभागातील साहित्य संमेलनांतून मराठी जागर केला जातो. प्रतिकूल परिस्थितीत मराठी संवर्धनाचे काम सुरू असून यातून मराठी भाषा, संस्कृतीचा प्रसार होत असल्याचे मत कुद्रेमानी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी व्यक्त केले.
कुद्रेमानी येथे 15 रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलन मंडपाची मुहुर्तमेढ रोपण कार्यक्रम मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा रेणुका नाईक होत्या.
प्रारंभी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून मिरवणूक काढून मुहुर्तमेढ कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणावर आणण्यात आली. मुहुर्तमेढ मिरवणुकीचे पूजन निंगाप्पा पाटील, जोतिबा पाटील यांनी केले. टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणुकीद्वारे मुहुर्तमेढ आणण्यात आली. मुहुर्तमेढ रोपण रामलिंग पाटील, वैष्णवी पाटील दांपत्याच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजन एसडीएमसी अध्यक्ष राजेंद्र जांबोटकर, सहदेव गुरव, विष्णू पन्हाळकर, ईश्वर गुरव, अर्जुन राजगोळकर यांनी केले. दीपप्रज्वलन अशिता सुतार, ग्रा. पं.सदस्या आरती लोहार, रुपाली पाटील, लता जांबोटकर, उज्वला काकतकर यांनी केले.
पी. एच. पाटील म्हणाले, मराठी भाषेला फार मोठा इतिहास आहे. कर्नाटकातील श्रवणबळगोळ येथे पहिला शिलालेख आढळला आहे. मराठी भाषा श्रीमंत असून तिच्यामध्ये विपुल अशी साहित्य निर्मिती केली जाते. सीमाभागातील साहित्य संमेलनांचे काम अजोड असे आहे. त्यांना राजाश्रय मिळत नसल्याने लोकाश्रय मिळण्याची आवश्यकता आहे.
एम. ओ. कोकीतकर म्हणाले, कुद्रेमानी संमेलनांने विचार पेरण्याचे काम केले आहे. याची प्रेरणा घेऊन अनेकजण लिखाण करत आहेत. वाचन करत आहेत. यातून अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे.
यावेळी एम. बी. गुरव, जी. जी. पाटील, बाळाराम धामणेकर, ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे, दत्ता कांबळे, अर्जुन जांबोटकर, परशराम पाटील, विलास गुरव, गावडू गुरव, शिवाजी गुरव, महादेव गुरव, उमेश गुरव, अनंत लोहार, कृष्णा धामणेकर, पीकेपीएस अध्यक्ष जोतिबा बडसकर, मल्लाप्पा कदम, कृष्णा धामणेकर, बाबाजी गुरव आदींसह बलभीम साहित्य संघाचे कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिवाजी शिंदे, स्वागत साहित्य संघाचे अध्यक्ष मारुती पाटील, सूत्रसंचालन नागेश राजगोळकर यांनी केले. आभार माणिक गोवेकर यांनी मानले.