बेळगाव : 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 19) फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार (ता. 15) रोजी सकाळी 11-00 वाजता झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते. प्रारंभी साहित्य संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत केले व बैठक बोलवण्याचा उद्देश सांगितला. त्यानंतर साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी गत सालाचा जमा-खर्च सर्वांसमोर मांडला व 19 फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच साहित्य संमेलन कशा पद्धतीने पार पाडावे, याविषयी चर्चा करण्यात आली. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नीटनेटके व व्यवस्थितरित्या पार पाडले जावे, त्याचबरोबर गत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साहित्य संमेलन थोडक्यात घेण्यात आले होते. पण यावर्षीचे साहित्य समेलन पूर्वीसारखेच मोठ्या प्रमाणात घेण्याचे ठरविण्यात आले. पूर्वीप्रमाणेच सर्व नियोजित कार्यक्रम हाती घेण्यात येतील. यामध्ये सर्व पुरस्कार, त्याचबरोबर संमेलनासाठी अभिनेता अथवा अभिनेत्रीला बोलाविण्याचेही ठरविण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्याचबरोबर इतर पाहुणे यांच्याबाबत माहिती सांगितली. संमेलन नीटनेटकेपणाने पार पाडू या असे सांगितले, तसेच संमेलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची गाथा सांगणारा “गीतराधाई उत्सवशाही” हा सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठकीला साहित्य संघाचे सदस्य परशराम बिजगरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, परशराम धामणेकर, सुभाष मजूकर, कृष्णा टक्केकर आदी यावेळी उपस्थित होते.